भुसावळ (प्रतिनिधी) – : जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2026 निमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात दि. 23 मे 2026 रोजी विविध रेल्वे स्थानके, रेल्वे वसाहती तसेच कार्यालय परिसरात स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासंदर्भात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचा उद्देश रेल्वे कर्मचारी, प्रवासी आणि नागरिकांमध्ये स्वच्छता, प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

यावेळी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेला असलेल्या प्रतीक्षालयात तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 5/6 वर मध्य रेल्वे भुसावळ मंडळाच्या स्काउट आणि गाईड पथकाने आकर्षक पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून प्रवासी व नागरिकांना स्वच्छता राखणे, प्लास्टिक प्रदूषण रोखणे, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करणे आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्वच्छ व हरित वातावरण राखण्यासाठी सहकार्य करण्याचा संकल्पही अनेकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमांतर्गत रेल्वे स्थानके, रेल्वे वसाहती आणि परिसरात स्वच्छता मोहीम सातत्याने राबविण्यात आली. तसेच रेल्वे परिसरात सिंगल यूज प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी तपासण्यात आली. प्लास्टिक बाटली क्रशिंग मशीन तसेच वॉटर रिफिल पॉइंट्सची पाहणीही करण्यात आली.
प्रवाशांना प्लास्टिक प्रदूषण आणि कचरा वर्गीकरणाबाबत जागरूक करण्यासाठी प्रवासी उद्घोषणा प्रणाली (PA System) द्वारे संदेश प्रसारित करण्यात आले. याशिवाय हिरवे आणि निळे डस्टबिन वापरण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहित करण्यात आले.
भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी अशा विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली..



