यावल – परसाळे येथे एका लग्नसमारंभादरम्यान वादळामुळे हळदी कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप उडाल्याची घटना १६ मे रोजी सायंकाळी घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून केवळ मंडपाचे नुकसान झाले आहे.

परसाळे येथील सलीम ईदबार तडवी यांच्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागात लग्नासाठी स्वतंत्र हॉल किंवा मोठ्या सुविधा उपलब्ध नसल्याने गावातील मोकळ्या जागेत मंडप उभारण्यात आला होता.
दुपारपासून मंडप उभारणीचे काम सुरू होते. परिसरात कुठेही वादळ किंवा पावसाची चिन्हे नसताना अचानक जोरदार वाऱ्यासह चक्रीवादळ आले आणि काही क्षणांत मंडप हवेत उडाला.
उडणाऱ्या मंडपाचे खांब धरणारे तरूण लटकले
मंडप उडत असल्याचे लक्षात येताच अनेक युवकांनी तत्काळ धाव घेत मंडप सावरण्याचा प्रयत्न केला. काही युवक मंडपाला धरून लटकलेले दिसून येत होते. हे दृश्य अत्यंत थरारक व भीतीदायक होते. मात्र, गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
हळदीच्या कार्यक्रमात मंडप उडाल्याची घटना घडल्यानंतर त्यातून सावरत १७ मे रोजी सलीम ईदबार तडवी यांच्या मुलीचा विवाह मोहरळे येथील मौलाना अमिन मैयमूद तडवी यांच्यासोबत सुखरूप पार पडला.
सध्या मे महिन्यात उष्णतेसोबत वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने ग्रामीण भागात उभारण्यात येणारे मंडप अधिक मजबूत व सुरक्षित पद्धतीने उभारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
मंडप उभारताना लोखंडी पाइप, मजबूत दोरखंड, योग्य अँकरिंग तसेच हवामानाचा अंदाज लक्षात घेणे आवश्यक असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.


