भुसावळ (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज शनिवार रोजी भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आयोजित द्वार दर्शन कार्यक्रमासाठी दुचाकीने प्रवास केला. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश पोहोचला.

यावेळी मंत्री सावकारे यांनी इंधनाची बचत ही काळाची गरज असल्याचे सांगत नागरिकांनी शक्य त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा दुचाकीचा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
त्यांच्या या अनोख्या प्रवासामुळे रस्त्यावरील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी मंत्री सावकारे यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत इंधन बचतीसाठी अशा कृतीतून व्यापक जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली.


