भुसावळ (प्रतिनिधी ) – तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील खडका व किन्ही एमआयडीसी परिसरातील उद्योजकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याबाबत तसेच रोड सेफ्टी संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

बैठकी दरम्यान कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर आणि पार्किंग परिसरात उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कंपनीतील कामगार व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. बाहेरील राज्यातून येणाऱ्या कर्मचारी व कामगारांची संपूर्ण माहिती स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदवून ठेवावी, असेही निर्देश पोलिसांकडून देण्यात आले.
औद्योगिक परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन, वस्तू अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी उद्योजक व व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि तक्रारी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, उद्योजकांकडील वाहन चालकांना रोड सेफ्टीबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित वाहन चालविण्याबाबत पोलिसांनी जागृती केली.


