भुसावळ येथे जीएनआरएफ मार्फत मोफत थंड पाण्याच्या स्टॉलचे उद्घाटन :

भुसावळ (प्रतिनिधी ) –
उन्हाळ्याच्या तीव्र लाटेमुळे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने प्रवासी व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर. आज दिनांक: १ मे २०२६ शुक्रवार रोजी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) च्या माध्यमातून भुसावळ येथे मोफत थंड पाण्याचा स्टॉल सुरू करण्यात आला आहे. हा स्टॉल बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाजवळ लावण्यात आला असून, त्यामुळे बस व रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळत आहे.

या स्टॉलचे उद्घाटन भुसावळ येथील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक हाजी सलीम सेठ जुडीवाला यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर अनेक प्रवासी व स्थानिक नागरिकांनी थंड पाणी पिऊन उष्णतेपासून आराम मिळवला.

यावेळी दावते इस्लामी इंडिया, जळगाव जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी यांनी सांगितले की, गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन ही दावते इस्लामीची सामाजिक व सेवाभावी शाखा असून समाजसेवा हेच तिचे मुख्य उद्दिष्ट आहे. संस्था विविध उपक्रम राबवते, ज्यामध्ये हिवाळ्यात ब्लँकेट वाटप, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय, पावसाळ्यात वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, नशाबंदी मोहिम तसेच गरजू कुटुंबांना रेशन किटचे वितरण यांचा समावेश आहे.

त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, अशा सेवाभावी कार्यात सहभागी व्हावे आणि आपल्या परिसरातही पाण्याचे स्टॉल लावून गरजूंची मदत करावी. तसेच घराबाहेर पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचेही आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीएनआरएफचे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन कादरी, भुसावळ शहराध्यक्ष सईद अत्तारी, हाजी तनवीर, फरीद शेख, युसुफ खान, हाफिज कासिम, कारी इद्रीस, साबिर मनियार, मौलाना झुल्फिकार मिस्बाही, इमरान शेख, अझहर कादरी अत्तारी आणि आसिफ अत्तारी यांनी विशेष परिश्रम घेतले.