भुसावळ पालिकेत राजकीय हालचालींना वेग; राष्ट्रवादीच्या महाजन भेटीने भाजप गोटात खळबळ

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळच्या राजकारणात सध्या मोठी हालचाल सुरू असून सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्ष आता नव्या टप्प्यात पोहोचला आहे.

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासह काही नगरसेवकांनी रविवारी जामनेर येथे जाऊन भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत गोपनीयता राखली जात असली तरी, या हालचालीमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भुसावळ पालिकेत राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद असले तरी सभागृहात भाजपकडे बहुमत आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये सतत राजकीय कोंडीची परिस्थिती निर्माण होत आहे. भाजपचे स्थानिक नेते संजय सावकारे यांनाही या राजकीय घडामोडींचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून महाजन यांची भेट घेणे ही सावकारे आणि भाजप नगरसेवकांना एकाचवेळी ‘चेकमेट’ देण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेतील १७६ विषयांवर भाजपने जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम ३०८ अंतर्गत ठराव रद्द करण्याची याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी २ एप्रिल रोजी होणार असून, राष्ट्रवादीच्या या भेटीमागे हेच कारण असावे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

या घडामोडींमुळे आणखी एक प्रश्न उपस्थित झाला आहे—राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ही भूमिका मान्य होईल का? भुसावळमधील सत्तांतरात खडसे यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी भाजपचा पारंपरिक मतदार वर्ग राष्ट्रवादीकडे वळवण्यात यश मिळवले होते. मात्र, त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या गिरीश महाजन यांच्याशीच राष्ट्रवादीचे नगरसेवक संपर्क साधत असल्याने अंतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही भेट घेतली होती. त्या भेटीनंतर काही नगरसेवक शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा होती. राज्याचे नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिक निधी मिळवण्याच्या दृष्टीने ही हालचाल असल्याचेही बोलले गेले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या भेटीनंतर भाजपचेही २७ नगरसेवक आणि ६ समर्थक नगरसेवक मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे समजते. या भेटीत ते आपली भूमिका मांडणार असून, त्यामुळे भुसावळचे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

एकूणच, भुसावळ पालिकेत सत्तेची समीकरणे बदलण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी हालचाली वेगाने सुरू असून, येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.