भुसावळ (प्रतिनिधी ) – डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने विभागीय रेल्वे रुग्णालय, भुसावळ येथे टेली-मेडिसिन सेवा अधिकृतपणे सुरू केली आहे. ही सेवा रेल्वे प्रशासन व रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू करण्यात आली असून, रेल्वे रुग्णालयांमध्ये टेली-कन्सल्टेशन सेवा अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे आरोग्य सेवांची उपलब्धता, कार्यक्षमता आणि सातत्य सुधारण्यास मदत होणार आहे.

टेली-कन्सल्टेशन वेळापत्रक
या अंतर्गत दर शुक्रवार दुपारी ३ ते ४ या वेळेत टेली-कन्सल्टेशन सेवा उपलब्ध राहणार आहे. विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेश ठाकरे आणि DRH मधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आवश्यकतेनुसार रुग्णांना ऑनलाईन सल्ला देणार आहे.
ही सेवा प्रामुख्याने रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः दुर्गम भागातील रेल्वे स्थानके व आरोग्य युनिट्समध्ये राहणाऱ्या लाभार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज उपलब्ध होणार आहे.
सुविधा आणि उपकरणे
टेली-मेडिसिनसाठी रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून, त्यामध्ये टीव्ही, संगणक आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅप कॉलद्वारे सल्लामसलत केली जाणार असून, रुग्णांना आपले वैद्यकीय अहवाल डिजिटल स्वरूपात पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे.
तज्ज्ञ नेटवर्क आणि समन्वय
या प्रणालीमुळे रुग्णांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांशी जोडणे शक्य होणार असून, अनावश्यक प्रवास टळणार आहे. डॉ. जितेश ठाकरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ते या सेवांचे समन्वय साधणार आहेत. आवश्यकतेनुसार तीन-मार्गी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अतिरिक्त तज्ज्ञांचा सहभागही घेता येणार आहे.
नेतृत्व आणि अंमलबजावणी
ही योजना विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली असून, मुख्य वैद्यकीय अधीक्षकांनी तिच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
टेली-मेडिसिन सेवेमुळे फायदे पुढीलप्रमाने
दरम्यान, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ही सेवा आपत्कालीन उपचारांना पूरक असून, गंभीर रुग्णांसाठी प्रत्यक्ष तपासणी आणि उपचाराची प्रक्रिया पूर्ववत सुरू राहणार आहे.
टेली-मेडिसिन सेवेच्या माध्यमातून रुग्णांचा वेळ वाचणार, प्रवासाचा त्रास कमी होणार आणि तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला अधिक सुलभ होणार आहे. या उपक्रमामुळे भुसावळ विभागात आधुनिक, पारदर्शक आणि रुग्ण-केंद्रित आरोग्य सेवेला बळकटी मिळणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पुढाकार भुसावळ विभागाच्या पारदर्शक, सुबद्ध आणि रुग्ण-केंद्रित आरोग्य सेवेसाठीच्या बांधिलकीचे सूचक आहे. तसेच, कर्मचारी कल्याण आणि आरोग्य सेवांच्या आधुनिकीकरणासाठीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. टेली-मेडिसिन सेवा सुरू झाल्यामुळे भुसावळ विभाग भारतीय रेल्वेमध्ये अधिक सुलभ, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे.
.



