भुसावळ (प्रतिनिधी)-: शहरातील हंबर्डीकर चौक परिसरात नायलॉन मांज्यात अडकून झाडावर उलटा लटकलेल्या पोपटाची भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने वेळेत धाव घेत सुखरूप सुटका केली. पशुप्रेमी राजेश तायडे यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे पोपटाचे प्राण वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हंबर्डीकर चौकातील पिंपळ आणि कडूलिंबाच्या जोडझाडावर पतंगाचा नायलॉन धागा अडकला होता. त्या धाग्यात एक पोपट अडकून दिवसभर रखरखत्या उन्हात उलटा लटकलेला होता. ही बाब पशुप्रेमी राजेश तायडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले.
यावेळी त्यांनी वन्यजीवप्रेमी तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे तालुका प्रतिनिधी सतीश कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भुसावळ नगरपालिकेच्या अग्निशामक दलाशी संपर्क करण्यात आला. अग्निशामक दलाचे अधिकारी विवेक माकोडे आणि गजेंद्र जावळे यांनी तातडीने दखल घेत जवानांना घटनास्थळी पाठवले.
अग्निशामक दलाचे जवान भूषण सोनवणे, देवेंद्र फलक आणि मयूर भोई यांनी अग्निबंब व शिडीच्या सहाय्याने झाडाच्या शेंड्यावर पोहोचून नायलॉन धाग्यात अडकलेल्या पोपटाची काळजीपूर्वक सुटका केली. त्यानंतर पोपटाला खाली आणून पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी राजेश तायडे, सतीश कांबळे तसेच मदत करणारे मयुरेश निंभोरे, अनिल भिंगाने, शिव टेंभुर्णीकर, योगेश वाघ आणि शाम तळेकर यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.


