भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे (पानाचे) येथे बसस्थानकावर शिवभक्तांनी रविवारी मध्यरात्री अचानक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने प्रशासनात खळबळ उडाली. महिलांसह शिवभक्तांनी पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करत पोलिसांना तो हटविण्यापासून रोखले. दरम्यान, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी १ ते २ महिन्यांत आवश्यक परवानग्या घेऊन नवीन पंचधातूचा पुतळा बसवण्याचे आश्वासन दिले.

कुऱ्हे (पानाचे) हे भुसावळ-जामनेर मार्गावरील मराठा बहुल गाव असून लोकसंख्येनुसार तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. अनेक वर्षांपासून बसस्थानकावर शिवरायांचा पुतळा उभारण्याची मागणी सुरू होती. चबुतऱ्याचे बांधकामही करण्यात आले होते; मात्र पुतळा बसवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रविवारी रात्री शिवभक्तांनी अचानक पुतळा स्थापन केला. सोमवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली.
सकाळी सुमारे ९ वाजता भुसावळचे डीवायएसपी केदार बारबोले, तालुका पोलीस स्टेशनचे पीआय महेश गायकवाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परवानगीशिवाय बसवलेला पुतळा हटविण्याच्या सूचना दिल्या. मंत्री संजय सावकारे यांनीही ग्रामपंचायत कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पवार व ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. बैठकीत शेजारील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीजवळ नवीन चबुतरा बांधून, रितसर परवानगी घेऊन पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, महिलांसह शिवभक्तांनी पुतळ्याशेजारी ठिय्या आंदोलन सुरू ठेवत तो हटविण्यास विरोध दर्शविला. नवीन पुतळा बसविण्यात येईपर्यंत सध्याचा पुतळा जागेवरच ठेवावा, अशी त्यांची ठाम भूमिका होती. बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सध्या बसविण्यात आलेला पुतळा तात्पुरता कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



