51 गुन्हे दाखल; 678 वाहनांवर कारवाई; 10 कोटींपेक्षा अधिक दंड

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सन 2025-26 या आर्थिक वर्षात व्यापक स्वरूपाची धडक कारवाई केली आहे. 1 एप्रिल 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तब्बल 678 वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 10,00,26,778 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी 6,99,71,250 रुपये वसूल करण्यात आले आहेत.
या कालावधीत अवैध गौणखनिज प्रकरणी 59 गुन्हे दाखल करण्यात आले असून अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेली 7 यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, 1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्ह्यात एकूण 6818.27 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. त्यापैकी 4039 ब्रास वाळूचा नियमानुसार लिलाव करण्यात आला असून त्यातून शासनास 60,49,933 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. उर्वरित जप्त वाळूसाठा शासन नियमांनुसार घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सन 2025-26 मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2025 दरम्यान पर्यावरण अनुमती प्राप्त 14 वाळूगटांसाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी 13 वाळूगटांचा यशस्वी लिलाव झाला असून 60,210 ब्रास वाळूसाठी 4,79,95,730 रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.
तालुकास्तरीय तांत्रिक समितीकडून प्राप्त 17 वाळूगटांचे जिल्हा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करण्यात आले असून भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर यांच्याकडे खाणकाम आराखडा मंजुरीची कार्यवाही सुरू आहे. मार्च 2026 मध्ये संबंधित 17 वाळूगटांचा ई-लिलाव प्रस्तावित आहे. तसेच नव्याने प्राप्त 96 वाळूगट प्रस्ताव पर्यावरण अनुमती प्रक्रियेसाठी सल्लागारांकडे पाठविण्यात आले आहेत.
अवैध उत्खनन रोखण्यासाठी 8 एप्रिल 2025 रोजीच्या वाळू धोरणानुसार महसूल, पोलिस व परिवहन विभागांच्या समन्वयातून जिल्हास्तरीय वाळू नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली असून जिल्ह्यात दक्षता व गस्ती पथके स्थापन करून सातत्याने कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे.तसेच जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननास प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



