भुसावळ : धुलीवंदनानिमित्त रंगीबेरंगी बाजार सजला; प्रेशर गन आणि म्युझिक बलूनची भुरळ

भुसावळ (प्रतिनिधी) : होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ रंगांनी न्हाऊन निघाली आहे. जामनेर रोड, वसंत टॉकीज परिसर आणि मुख्य मार्केट भागात विविध रंगांच्या व आकर्षक आकारांच्या पिचकाऱ्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. एरवी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणाऱ्या गल्लीबोळांत सध्या बालगोपालांचा किलबिलाट ऐकू येत आहे.

यंदा पारंपरिक पिचकाऱ्यांबरोबरच कार्टून कॅरेक्टर, स्कूलबॅग आणि धार्मिक शस्त्रांच्या आकारातील पिचकाऱ्यांनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. लहान मुलांसाठी पाठीवर टांगता येणारी ‘स्कूलबॅग पिचकारी’ विशेष आकर्षण ठरत आहे. या पिचकाऱ्यांमध्ये १ ते ४ लिटर पाणी साठवण्याची क्षमता असल्याने एकदा रंग भरल्यानंतर मुले बराच वेळ खेळू शकतात. त्यामुळे बच्चे कंपनीचा याकडे अधिक कल दिसून येत आहे.

तरुणाईमध्ये ‘गदा’, ‘त्रिशूळ’ आणि ‘डमरू’ या आकारातील पिचकाऱ्यांची मागणी वाढली आहे. याशिवाय प्रेशर गन आणि म्युझिक बलूननेही मुलांना भुरळ घातली आहे. विविध आकार आणि क्षमतेनुसार पिचकाऱ्यांच्या किंमती ४० रुपयांपासून ९०० रुपयांपर्यंत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

सुरक्षेच्या दृष्टीने यंदा नैसर्गिक रंगांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. त्वचेला अपायकारक रासायनिक रंगांऐवजी हर्बल व ऑर्गॅनिक रंगांची मागणी वाढल्याचे चित्र आहे.

दरम्यान, पिचकाऱ्यांच्या किंमतीत यंदा सुमारे १५ टक्क्यांची वाढ झाली असली तरी खरेदीवर त्याचा विशेष परिणाम झालेला नाही. “गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही स्कूलबॅग पिचकारीची क्रेझ कायम आहे. दर वाढले असले तरी ग्राहकांचा उत्साह कमी झालेला नाही,” असे विक्रेते संतोष भंगाळे यांनी सांगितले.

धुलीवंदनाच्या स्वागतासाठी सजलेल्या या रंगीबेरंगी बाजारामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सणाच्या पार्श्वभूमीवर उलाढालीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.