भुसावळ (प्रतिनिधी) – सर्वे क्रमांक 115/1/अ, श्रद्धा नगर, संत गजानन महाराज देवस्थान परिसर, भुसावळ हद्दीबाहेर येथे झालेल्या अतिक्रमणाबाबत रहिवासी प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे.

सदर ठिकाणी सिमेंट गोडाऊन, संडास व बाथरूम, भव्य पत्र्याचे शेड तसेच गुरेढोरे ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या गोठ्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. या अस्वच्छ व अस्वास्थ्यकारक परिस्थितीमुळे परिसरातील काही नागरिकांना त्वचारोगाचा त्रास सुरू झाला असून कीटकदंशामुळे संसर्ग वाढल्याची शक्यता वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तींना तीव्र वेदना व त्रास सहन करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले असून, कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. तरीही आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नसल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे. जर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर प्रांत कार्यालयासमोर “खटिया टाकून” आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही मागणी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक द्वेषातून नसून सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि कायदेशीर हक्कांच्या रक्षणासाठी असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी प्रमोद जगन्नाथ पाटील यांचेसह परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.


