अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून ३१ हजारांची खंडणी

जळगाव : दोन पुरुषांचा अश्लील व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून ३१ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दि. २५ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथे घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याने मोबाईलमध्ये एक अॅप डाउनलोड केले होते. त्याद्वारे त्याची एका व्यक्तीशी ओळख झाली. काही दिवसांनंतर तिसऱ्या व्यक्तीने दोघांचा अश्लील व्हिडिओ तयार केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी कर्मचाऱ्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने ३१ हजार रुपये उकळले.

रक्कम दिल्यानंतरही आरोपींकडून अधिक पैशांची मागणी सुरूच होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध खंडणी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.