भुसावळच्या महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी ! सोमवार, ११ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ; कुंकुमार्चन, सप्तशती पाठ, भजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील खडका रोडवरील पुरातन व जागृत श्री महालक्ष्मी माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाटील व बऱ्हाटे परिवारासह परिसरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात रवीवार, दि. ११ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत सुधीर पाटील यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना व पूजन करण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात कुंकुमार्चन, पूजा, आरती, अष्टमीला होम-हवन, सप्तशती पाठ तसेच महिला भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मंदिर परिसरात नऊ दिवस भक्तिमय वातावरण राहणार असून, भाविकांना विविध धार्मिक उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

दररोज सकाळी व सायंकाळी आरती

नवरात्रोत्सव काळात मंदिरात दररोज सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता आरती होणार आहे. तसेच मंदिरातील दैनंदिन कार्यक्रमांची माहिती एक दिवस आधी व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून भाविकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी संबंधित सूचनांची नोंद घेऊन धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मंदिर सजावटीसह उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी सुधीर पाटील, प्रकाश पाटील, लीलाधर भारंबे, चंद्रकांत पाटील, खिलेश बऱ्हाटे, अभिषेक पाटील, ज्ञानदेव भारंबे (माऊली), संजय बऱ्हाटे, राठोड यांच्यासह महालक्ष्मी ग्रुपचे सदस्य आणि परिसरातील भाविक परिश्रम घेत आहेत.

श्री महालक्ष्मी माता मंदिर समिती, खडका रोड, भुसावळ यांच्या वतीने सर्व भाविकांनी नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून मातेचे दर्शन घ्यावे व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.