भुसावळ (प्रतिनिधी ) – पीशहरात २२ वर्षीय तरुणीवर ओळखीच्या व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी राजू गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी नोकरी करत असून ती भाड्याच्या घरात राहते. संशयिताने तिला बसस्थानक परिसरात बोलावून कार्यालयात नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयितास ताब्यात घेतले. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


