भारतीय जनता पार्टीतर्फे भुसावळात शिवजयंती उत्साहात साजरी :


भुसावळ (प्रतिनिधी ): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरातर्फे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
जयंतीनिमित्त पुतळ्याचा संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाई व सजावटीने सुशोभित करण्यात आला होता. पहाटेपासूनच शिवभक्तांनी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमास पक्षाचे गटनेते युवराज लोणारी, उपनगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त शहरात देशभक्ती व शिवभक्तीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता.