भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता घडली. या प्रकरणी रात्री उशिरा भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आपल्या कुटुंबियांसह घरी असताना धनराज कनैय्यालाल कुकरेजा (रा. भुसावळ) हा संशयित आरोपी त्यांच्या घरात घुसला. त्याने महिलेशी गैरवर्तन करत तिचा हात पकडून विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या वेळी आरोपीने धक्काबुक्की केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश चौधरी करीत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.


