भुसावळ बसस्थानकात मोबाईल चोरटा जेरबंद; ४२ हजारांचे मोबाईल जप्त


भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन तरुणांचे सुमारे ४२ हजार रुपये किंमतीचे महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. १२ फेब्रुवारी) सायंकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश समाधान वराडे (रा. टाकळी, ता. जामनेर) हा तरुण आपल्या मित्रासह सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भुसावळ बसस्थानकावर आला होता. बसमध्ये चढताना संशयित आरोपी तनवीर शेख रहीम शेख (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याने नजर चुकवून योगेश व त्याच्या मित्राच्या खिशातील दोन महागडे मोबाईल शिताफीने लांबवले.
मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच दोन्ही तरुणांनी तात्काळ भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. योगेश वराडे यांच्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता संशयित आरोपी तनवीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल केदार पुढील तपास करीत आहेत. आरोपीकडून चोरीस गेलेले दोन्ही मोबाईल हस्तगत करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.