भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील नसरवांजी फाईल परिसर, मटन मार्केट पाठीमागील भागात धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी अक्षरशः गॅस कटरच्या साहाय्याने कपाट फोडून रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यांवर हात साफ केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, येथील रहिवासी जमीला रऊफ कुरेशी या दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने बडनेरा येथे गेल्या होत्या. आईची प्रकृती गंभीर असल्याने त्या तेथेच थांबल्या. दरम्यान, त्यांनी गुरुवारी आपल्या मुलगी व जावयास घराची पाहणी करण्यास सांगितले.
मुलगी व जावई घरात पाहणीसाठी गेले असता मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी घरातील दोन्ही खोल्यांचे कडी-कोंडे तुटलेल्या अवस्थेत आढळले. एका खोलीतील पेटी फोडलेली होती, तर दुसऱ्या खोलीतील कपाटांचे लॉक तोडण्यात आले होते. विशेष म्हणजे एका कपाटाचे लॉक गॅस कटरच्या साहाय्याने कापण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले.
या घरफोडीत अंदाजे ₹95,000 रोख रक्कम चोरीला गेली असून एका गल्ल्यातील रकमेबाबत अचूक माहिती उपलब्ध नाही. सोन्या चांदीचे दागिन्यांसह अन्य मौल्यवान ऐवज लंपास केला .
विशेष म्हणजे कपाटालगतचा बाहेरील दरवाजा आतून कडी लावलेला असतानाही चोरट्यांनी तो गल्लीतून बाहेरून बंद केल्याचे आढळल्याने ही चोरी पूर्वनियोजन करुन केल्याचा दात संशय व्यक्त केला जात आहे.घर तब्बल आठ दिवस बंद असल्याने नेमक्या कोणत्या दिवशी चोरी झाली, हा तपासाचा प्रमुख मुद्दा ठरत आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून, चोरट्यांचा माग काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे.
भर वस्तीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरात वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


