भुसावळ यार्डातील आरपीएफच्या नव्या इमारतीचे उद्घाटन : डॉग स्क्वॉडचे निरीक्षण; चार ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ मोटारसायकलींना हिरवा झेंडा

भुसावळ (प्रतिनिधी ) – रेल्वे सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी भुसावळ यार्ड येथील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ठाण्याच्या नवनिर्मित इमारतीचे उद्घाटन दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले. प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, रेसुब मुंबई श्री. विवेक सागर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागचे डीआरएम श्री. पुनीत अग्रवाल प्रमुख उपस्थित होते.

नव्या इमारतीमुळे आरपीएफ ठाण्याचे कामकाज अधिक सुटसुटीत व कार्यक्षम होणार असून, यार्ड परिसरातील सुरक्षा व्यवस्थेला गती मिळणार आहे. भुसावळ हे मध्य रेल्वेतील महत्त्वाचे जंक्शन असल्याने येथे सुरक्षा व्यवस्था सक्षम असणे अत्यावश्यक आहे. आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा या इमारतीमुळे विभागातील सुरक्षा यंत्रणेला मोठी मदत होणार आहे.

उद्घाटनानंतर प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांनी आरपीएफ डॉग स्क्वॉडला भेट देत तेथील सुविधांची पाहणी केली. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांच्या उपस्थितीत डॉग स्क्वॉडचे सविस्तर निरीक्षण करण्यात आले. स्फोटक शोध, गुन्हे प्रतिबंध व विशेष मोहिमांमध्ये डॉग स्क्वॉडची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान चार नवीन ‘Royal Enfield बुलेट’ मोटारसायकलींना संयुक्तरित्या हिरवा झेंडा दाखवून फ्लॅग ऑफ करण्यात आले. या मोटारसायकलींच्या माध्यमातून यार्ड व रेल्वे परिसरात गस्त अधिक वेगाने आणि प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर तातडीने नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे.

कार्यक्रमास रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या इमारतीमुळे आणि आधुनिक साधनसामग्रीच्या उपलब्धतेमुळे भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.