प्रभाग क्रमांक 20 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिर संपन्न ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – प्रभाग क्रमांक 20 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणारे व लाभ देणारे विशेष शिबिर उत्साहात पार पडले. नगरसेविका सौ. सीमा प्रशांत नरवाडे यांच्या पुढाकारातून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार सौ. प्रीती लुटे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती देत त्यांच्या शंकांचे समाधान केले. तसेच प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनीताई संजय सावकारे यांनी मार्गदर्शन करत ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला व अपंग महिलांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात अशी मागणी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट केल्याबद्दल रजनीताई सावकारे यांनी नगरसेविका सौ. सीमा नरवाडे यांचे कौतुक करून आभार मानले.

या प्रसंगी भाजप शहर सचिव सौ. वंदना सोनार, भाजप एससी सेल शहराध्यक्ष रवींद्र दाभाडे, अश्विन नरवाडे, गौतम नगर आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र हिवराळे, पंडित दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभागातील शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. उपस्थितांचे अर्ज व फॉर्म यावेळी भरून घेण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक नरवाडे व भाजपा शहर सरचिटणीस जयंत माहुरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत नरवाडे यांनी केले.

या उपक्रमामुळे प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभरीत्या मिळण्यास मदत झाली असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.