मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) तत्पर कारवाई करत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप ठेवणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या या प्रकाराचा उलगडा करत आरपीएफ पथकाने १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंब्रा येथून आरोपीला ताब्यात घेतले.

नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ३७ वर्षीय जगन अर्जुन भाले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी गाडी क्रमांक २२२२५ वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-१६ कोचच्या शौचालयात साप आढळून आला होता. घटनेनंतर संबंधित शौचालय तात्काळ बंद करण्यात आले व नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. सोलापूर स्थानकावर साप सुरक्षितपणे पकडण्यात आला.
घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असता एका अज्ञात व्यक्तीने शौचालयात साप ठेवल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी रेल्वे कायदा, १९८९ च्या कलम १४५(ब), १४७ आणि १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरपीएफने सखोल तपास करत मुंब्रा येथून आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला कल्याण येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १४ दिवसांची दंडाधिकारी कोठडी (एमसीआर) सुनावली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने कमी वेळात गुन्ह्याचा छडा लावत सतर्कता व तपास कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे संरक्षण दल सतत दक्ष असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.




