किन्ही एमआयडीसी परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई; डंपर जप्त, २.३९ लाखांचा दंड वसूल

भुसावळ, (प्रतिनिधी ) – भुसावळ महसूल विभागाच्या पथकाने मौजे किन्ही येथील एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसरात अवैध गौण खनिज (डबर/मुरुम) वाहतुकीवर धडक कारवाई करत डंपर जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण २ लाख ३९ हजार २३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशा कन्स्ट्रक्शन कंपनीचा MH-19-CY-0438 क्रमांकाचा डंपर गौण खनिज (डबर) वाहतूक करत असताना महसूल पथकाच्या निदर्शनास आला. वाहनाकडे वैध गौण खनिज वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आल्याने पथकाने तत्काळ कारवाई करत डंपर जप्त केला. सदर वाहन सध्या भुसावळ तहसील कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले की, गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन सातत्याने विशेष मोहिमा राबवत असून, अशा प्रकरणांमध्ये कठोर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या कारवाईत मंडळ अधिकारी (पिंपळगाव) श्रीमती वैशाली पाटील, प्रमोद ठोसर, तलाठी किन्ही कोमल भुजाडे, तलाठी खडका, तलाठी पिंपळगाव बुद्रुक मिलिंद तायडे तसेच तलाठी पिंपळगाव खुर्द सुनील कचगुंडे यांचा सहभाग होता.

तहसीलदार नीता लबडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गौण खनिजाच्या अवैध उत्खनन किंवा वाहतुकीची माहिती प्रशासनाला द्यावी. महसूल विभागाच्या सातत्यपूर्ण संयुक्त कारवाईमुळे स्थानिक स्तरावर अवैध उत्खनन व वाहतुकीवर प्रभावी अंकुश बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.