भुसावळात भरदिवसा चाकूहल्ला; १३ वर्षीय मुलगा गंभीर, परिसरात भीतीचे वातावरण

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील अत्यंत गजबजलेल्या रजा टॉवर चौकात गुरुवारी दुपारी किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. अज्ञात इसमाने केलेल्या चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला असून, २० वर्षीय तरुणही जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास रजा टॉवर चौकात शेख समशेर शेख सलीम (वय १३) आणि मोहम्मद असत मोहम्मद अस्लम मेमन (वय २०) यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली; मात्र काही वेळातच वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने धारदार चाकूने हल्ला केला.

या हल्ल्यात शेख समशेर याच्या डाव्या कानाजवळ खोलवर वार लागल्याने तो जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला. तसेच मोहम्मद असत याच्या डाव्या मांडीवर चाकू लागल्याने तोही जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर (ग्रामीण रुग्णालय) येथे दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांनी सांगितले की, “१३ वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असून तो काही काळ बेशुद्ध होता. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.” दुसऱ्या जखमी तरुणावर भुसावळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची नोंद बाजारपेठ पोलीस ठाण्यात अद्याप झालेली नसून, जखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.