ऑल इंडिया एस.सी. अँड एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्यावतीने २२ प्रमुख मागण्यांसाठी उद्या भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रचंड धरणे आंदोलन

भुसावळ (. प्रतिनिधि): ऑल इंडिया एस.सी. अँड एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, भुसावळ मंडळाच्या वतीने विविध २२ प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे प्रचंड धरणे व निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ही माहिती झोनल कार्याध्यक्ष सुधीर जंजाळे, मंडळाध्यक्ष वाल्मीक देहाडे व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष अशोक महामंत्री यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेस आर.सी. रावत, तायडे, विशाल सपकाळे, पी.के. वर्मा आदी उपस्थित होते.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२५ मध्ये लागू केलेले कामगारविरोधी चार लेबर कोड तात्काळ रद्द करावेत. पदोन्नतीतील आरक्षण १९ जून २०१८ पासून पोस्ट फॅक्टो प्रभावासह लागू करावे. नाईट पेट्रोलिंगसाठी १५ किमीचा आदेश रद्द करून पूर्ववत १२ किमी करावा तसेच सर्व विभागांचे टीए व नाईट ड्युटी भत्ते नियमित करावेत.

आरआरसीमार्फत जीडीसीईच्या माध्यमातून सर्व विभागांतील रिक्त पदे भरावीत. बोदवड डेपो येथील एसएसई (पीडब्ल्यू) यांची तात्काळ बदली करावी. रेल्वे क्वार्टरच्या दुरुस्ती व देखभालीतील भेदभाव थांबवून सर्वांना समान सुविधा द्याव्यात. पॅसेंजर व मेल-एक्सप्रेस ट्रेन मॅनेजर पदांची पिनपॉईंटिंग करून पदसंख्या वाढवावी तसेच ऑपरेटिंग विभागातील पॉईंट्समन कर्मचाऱ्यांचे कामाचे तास १२ ऐवजी ८ करावेत.

असोसिएशनच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या बदलींवर स्थगिती द्यावी. एपीओ (ॲडमिन) यांची दुसऱ्या मंडळात बदली करावी. वैद्यकीयदृष्ट्या डी-कॅटेगराइज्ड कर्मचाऱ्यांना रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार पर्यायी पदांवर नियुक्ती द्यावी. नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी.

भुसावळ रेल्वे रुग्णालयास “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांचे नाव देऊन त्यांची प्रतिमा पुनः स्थापित करावी. नव्याने बांधण्यात येणाऱ्या क्रीडांगणास “शिव-फुले-शाहू-आंबेडकर स्पोर्ट्स ग्राउंड” असे नामकरण करावे. डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर महापुरुषांचे चित्र पूर्ववत लावावेत तसेच भुसावळ स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अजिंठा लेणीचे चित्र पूर्वीप्रमाणे रंगवावे.

सन २०१६ च्या अधिसूचनेनुसार निवड झालेल्या उर्वरित ट्रॅक मेंटेनर कर्मचाऱ्यांना पीओएच वर्कशॉपसाठी रिलीव्ह करावे. एससी व एसटी कर्मचाऱ्यांची पोस्टिंग व बदली रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार करावी. भुसावळ येथे कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार नवीन रेल्वे क्वार्टरची उभारणी करावी. तसेच आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात.

याशिवाय, जुनी नगरपालिका समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण १४ एप्रिलपूर्वी करण्यात यावे यासाठी संबंधित विभाग व नगराध्यक्षांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

.