रोटरी रेलसिटीचा सायक्लोथॉन : प्रदूषणमुक्त भुसावळचा संदेश :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळकरांसाठी रविवारची पहाट आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक संदेश घेऊन आली. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व आमदार ना. संजय सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोटरी सायक्लोथॉनमध्ये तब्बल ५३८ सायकलस्वारांनी सहभाग नोंदवत “प्रदूषणमुक्त, हरित भुसावळ”चा नारा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस. ग्राउंड) येथून सकाळी ६ वाजता रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. सायक्लोथॉन २० किमी (कुऱ्हे पानाचे), १० किमी (मिलिटरी स्कूल) आणि ५ किमी (हॉटेल हेवन) अशा तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.

रॅलीदरम्यान कोणालाही इजा होऊ नये व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी रोटरी रेलसिटीचे सदस्य व क्रीडा शिक्षक मार्गावर ठिकठिकाणी उभे राहून मार्गदर्शन करत होते. अत्यंत उत्साही वातावरणात रॅलीची सांगता झाली.

कार्यक्रमानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून ५ स्मार्ट वॉच, ५ सायकल हेल्मेट आणि ५ सायकली अशी एकूण १५ बक्षिसांचे वितरण करण्यात आले. हेल्मेट बक्षीस ओजस शर्मा, कौस्तुभ पाटील, हेरंब चौधरी, अमेय श्रावगी व विहान राणे यांना मिळाले. स्मार्ट वॉच बक्षीस रेवा फडणीस, गार्गव नेहेते, भावेश वाढे, धनुष्का मुजुमदार व तोषित पाटील यांना देण्यात आले. तर सायकल बक्षीस आदित्य कचरे, यश भोगे, उमंग तळेले, गुणिता भोळे व श्लोक सोनावणे यांनी पटकावले.

कार्यक्रमात दिलदारपणाचे दर्शन घडले. लकी ड्रॉमध्ये सायकल जिंकलेल्या श्रीनील देशमुख यांनी स्वतःकडे आधीच नवीन सायकल असल्याचे सांगून ती सायकल स्वेच्छेने दान केली व नव्याने लकी ड्रॉ काढून सायकल दुसऱ्या विजेत्यास देण्यात आली.

बक्षीस वितरण आमदार ना. संजय सावकारे, ओबेनॉल केमिकल्सचे अश्विन परदेशी, सुवर्णा सायकल मार्टचे दलजीत चौधरी, मोंजिनीसचे अॅड. तुषार पाटील, ईनरव्हील रेल सिटीच्या अध्यक्षा सीमा सोनार, रोटरी अध्यक्ष देवा वाणी, सचिव हरमीतसिंग माखन, अल्ट्रा सायकलिस्ट जगदीश रेहपाडे व युवराज सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.

बी.एन. अग्रवाल, मनोजभाऊ बियाणी व एनरझाल एनर्जी ड्रिंक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. राहुल पांडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष देवा वाणी, सचिव हरमीतसिंग माखन, प्रोजेक्ट चेअरमन सोनू मांडे, को-चेअरमन सचिन अग्रवाल व समस्त रोटरी रेलसिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.