वरणगाव रनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू चमकलेएकता भगत, सायली बेंडाळे, पुष्पा तिवारी व विश्वनाथ पावरा विजेते : असोसिएशनच्या ६० धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग :

भुसावळ (प्रतिनिधी ) – वरणगाव सिव्हिल सोसायटीतर्फे आयोजित रन फॉर वरणगाव या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन (BSARA) च्या तब्बल ६० धावपटूंनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली. विविध वयोगटांत झालेल्या या स्पर्धेत भुसावळच्या धावपटूंनी उत्कृष्ट धावण्याचा प्रत्यय देत यश संपादन केले.

१० किमी महिलांच्या गटात एकता भगत हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर सायली बेंडाळे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. ५ किमी महिलांच्या गटात पुष्पा तिवारी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ५ किमी पुरुषांच्या गटात विश्वनाथ पावरा याने द्वितीय क्रमांक मिळवून असोसिएशनच्या यशात भर घातली.

विजेते धावपटू मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारत असताना भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या इतर धावपटूंनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर वरणगाव सिव्हिल सोसायटीतर्फे या रनचे सदिच्छादूत डॉ. चारुलता पाटील व गणसिंग पाटील यांच्यासह असोसिएशनच्या उपाध्यक्षा डॉ. नीलिमा नेहेते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आपल्या सहकारी धावपटूंच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना विशेष आनंद झाल्याची भावना विजयी धावपटूंनी व्यक्त केली. या यशाबद्दल भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रविण फालक यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे खेळाडू सातत्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत आहेत. या यशाबद्दल सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी धावपटूंचे अभिनंदन करण्यात येत असल्याची माहिती असोसिएशनचे सचिव प्रविण पाटील यांनी दिली.