भुसावळ (प्रतिनिधी) –
शहरालगत असलेल्या मौजे भुसावळ येथील जामनेर रोडवरील माऊली प्लाझा (स.नं. 115/1/अ, प्लॉट नं. 09) येथील इमारत बांधकामात अनधिकृत बदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी प्रशासनाने कारवाईची तयारी सुरू केली आहे.

सदर इमारतीस मंजूर सुधारित बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष बांधकाम करताना मंजूर नकाशा तसेच परवानगीतील अटी व शर्तीचे उल्लंघन करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित जमीनधारकास नोटीस बजावण्यात आली होती; तथापि, ठराविक मुदतीत कोणताही खुलासा सादर न केल्याने पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या कलम 55 व 56 अन्वये अनधिकृत व अतिरीक्त बांधकामाबाबत प्रत्यक्ष मोजमाप व तांत्रिक तपासणी करण्यासाठी दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता संयुक्त पाहणी आयोजित करण्यात आली आहे.
या पाहणीस नगररचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भुमि अभिलेख विभाग तसेच महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून, पाहणी अहवालानुसार पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


