सावदा : फैजपुर रोडवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग; पाच दुकाने जळून खाक


सावदा(प्रतिनिधी ) – शहरातील फैजपुर रोडवर विश्वसुधा हॉस्पिटलजवळ असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मंगळवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाली असून अंदाजे 25 ते 30 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगीची तीव्रता मोठी असल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.