भुसावळात रंगणार राज्यस्तरीय खुली फुटबॉल स्पर्धा :


भुसावळ :प्रतिनिधी
ताप्ती ईगल स्पोर्ट असोसिएशन यांच्या वतीने पांडुरंग लोखंडे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय खुल्या इलेव्हन-ए-साईड फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट येथील स्पोर्ट्स ग्राउंड, भुसावळ येथे दिनांक ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई, पुणे, अमरावती, अकोला, धुळे, जालना, पुसद, जळगाव व भुसावळ येथील नामवंत फुटबॉल संघांचा सहभाग आहे.
इलेव्हन-ए-साईड फुटबॉल टूर्नामेंट भव्य व दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली असून, क्रीडा क्षेत्रातील सरकारी सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त क्रीडाप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ही स्पर्धा सर्व युवा क्रीडाप्रेमींसाठी एक उत्साहवर्धक पर्वणी ठरणार आहे.
सदर स्पर्धेसाठी सेवानिवृत्त उप अभियंता सुभाष लोखंडे, सेवानिवृत्त पीएसआय भास्कर पाटील व संजीव पाटील यांचे मार्गदर्शन आहे. स्पर्धेच्या बक्षीस वितरण 7 फेब्रुवारीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तसेच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
या टूर्नामेंटचे प्रकल्प प्रमुख सुभाष लोखंडे असून, ताप्ती ईगल स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश महाजन, उपाध्यक्ष डॉ. संजय भटकर, सचिव दिलीप मोरे व सर्व पदाधिकारी कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत.