भुसावळ दि. ३ फेब्रुवारी २०२६)
भुसावळ नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. मात्र काही विषयांवरून सभागृहात तीव्र चर्चा व वाद निर्माण होऊन काही काळ तणावाचे वातावरण होते. प्रभाग क्रमांक २ मधील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून विशेष गदारोळ झाला. जेष्ठ नगरसेवक संतोष चौधरी यांनी मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले.

सभेतील विषय क्रमांक १ अंतर्गत कब्रस्तानासाठी लाकडे व गौऱ्या पुरवण्यास मंजुरी देण्यापूर्वी भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या विषयावर यापूर्वी लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदवले असल्याने सावधगिरीने निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
विषय क्रमांक २२ अंतर्गत उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी नदीपात्रातून ‘पाणबुडी’द्वारे पाणी उचलून जॅकवेलमध्ये सोडण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. मात्र ‘पाणबुडी’ या संज्ञेचा नेमका अर्थ अधिकारी स्पष्ट करू न शकल्याने सर्व नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.
आजच्या सभेत प्रभाग क्रमांक २ साठी तब्बल ४२ विषय मंजुरीसाठी मांडण्यात आल्याने भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी यावर आक्षेप घेत ‘लाडका नगरसेवक योजना’ राबवली जात आहे का? असा सवाल उपस्थित केला. यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन पाटील यांनी आक्षेप घेतल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. इतर नगरसेवकही वादात सहभागी झाल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला व काही काळ कामकाज स्थगित करण्यात आले.
भाजपच्या नगरसेवकांनी उर्वरित विषयांबाबत आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्र मुख्याधिकाऱ्यांना सादर केले. काही विषयांना मंजुरी मिळाली असली तरी प्रभाग क्रमांक २ च्या विषयांवरून सभेचे वातावरण चांगलेच तापले होते.
भुसावळ शहरातील सिटी सर्वे नं. १६१ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलाच्या दुरुस्तीचा व न्यायालयाच्या आदेशानुसार ६० गाळे आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावाला भाजप नगरसेवकांनी ‘ऑप्शन’ घेऊन विरोध दर्शविला. यापूर्वीचे ५७ गाळेधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी युवराज लोणारी यांनी केली.
दरम्यान, आयत्या वेळेच्या विषयात सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो सभागृहात लावण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच जामनेर रोडवरील दिनदयाल नगर ते राजपूत चाट दरम्यानच्या बंद स्ट्रीट लाईटबाबत नगरसेवक किरण कोलते यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. संबंधित अधिकारी मनोज मोरे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
सभेला नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपनगराध्यक्षा शैलैजा नारखेडे, जेष्ठ नगरसेवक संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे गटनेते सचिन चौधरी, भाजप गटनेते युवराज लोणारी, मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


