चोपडा – चोपडा तालुक्यातील उमर्टी गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, २८ वर्षीय महिलेने आपल्या अडीच वर्षांच्या मुलासह आणि अवघ्या १५ दिवसांच्या नवजात बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मयत महिलेचे नाव पमिता डोंगरसिंग पावरा (वय २८) असे असून, तिच्यासोबत तिचा मोठा मुलगा विरेन (वय अडीच वर्षे) आणि १५ दिवसांचे नवजात बाळ यांचे मृतदेह बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या स्वतःच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आले.
पमिता ही मंगळवारपासून दोन्ही मुलांसह बेपत्ता होती. काही दिवसांपूर्वीच तिची प्रसूती झाली होती आणि ती बाळंतपणानंतर विश्रांतीसाठी माहेरी आली होती. मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी तिच्या पतीने तिला सासरी नेले होते. त्यानंतर मंगळवारी ती बेपत्ता झाली आणि बुधवारी तिघांचेही मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.
या प्रकरणी मृत महिलेचा भाऊ आकाश पावरा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीनंतर केवळ १५ दिवस झाले असल्याने पमिताला आणखी काही दिवस माहेरी विश्रांती घेऊ द्यावी, अशी विनंती सासरच्या मंडळींना करण्यात आली होती. मात्र, ही विनंती नाकारत मेहुण्यांनी तिला जबरदस्तीने सासरी नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मंगळवारी पमिता बेपत्ता असल्याची आणि बुधवारी तिचा मृत्यू झाल्याची माहिती सासरकडील मंडळींकडूनच देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांनी सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.


