मोफत आरोग्य व रक्त तपासणीसह हिरकणी महिला मंचचे आगळेवेगळे हळदीकुंकू

भुसावळ (प्रतिनिधी ) – आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच यांच्या वतीने दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे महिलांसाठी हळदीकुंकवाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक हळदीकुंकवाच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत रक्त तपासणी आयोजित करण्यात आली.

या प्रसंगी वसंत पंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्ञान, विद्या व संस्कृतीचे प्रतीक असलेल्या माता सरस्वतीची विधीवत पूजा करण्यात आली. सरस्वती पूजनामुळे संपूर्ण कार्यक्रमाला आध्यात्मिक व मंगल वातावरण लाभले.

या कार्यक्रमाचे पूर्वनियोजन हिरकणी महिला मंचच्या अध्यक्षा आशाताई पाटील, उपाध्यक्षा कल्पना सोनवणे तसेच मंचच्या सर्व सदस्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या लेक्चरर मनीषा बाविस्कर मॅडम यांनी केले, तर प्रस्तावना प्राचार्या डॉ. रजनी बडगुजर मॅडम यांनी केली.

यावेळी आर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. वंदना वाघचौरे मॅडम यांनी महिलांना चाळीशीनंतर उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच सक्षम काउन्सलिंगच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी महिलांनी जीवन यशस्वीपणे कसे जगावे व मानसिक आजारांपासून कसे दूर राहावे यावर मार्गदर्शन केले.

या उपक्रमांतर्गत श्री व्यंकटेश बालाजी क्लिनिकल लॅबोरेटरीच्या माध्यमातून व अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उपस्थित महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाला पत्रकार उज्वला बागुल, सौ. निरंजना साळवे, महानंदा पाटील, सुनिता काबरा, मंदाकिनी केदारे यांनी विशेष उपस्थिती लावली.


शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांसह सीनियर विद्यार्थी गोपाळ, हर्षा सपकाळे व अदिती कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, उखाणे व गमतीशीर खेळांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमात आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी हिरकणी महिला मंचच्या उपाध्यक्षा कल्पना सोनवणे यांनी सर्व मान्यवर, सहकारी व उपस्थित महिलांचे आभार मानले.