भुसावळ (प्रतिनिधी) – दि. २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पुणे–जळगाव मार्गावरील एस.टी. बस (क्र. MH 06 BW 0542) सिल्लोड येथून जळगावकडे जात असताना एक थरारक मात्र आनंददायी घटना घडली. या बसमध्ये गरोदर महिलेची सुखरूप प्रसूती झाली प्रवासी, चालक-वाहक व ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मातृ-शिशूचे प्राण वाचले

सदर बसमध्ये प्रवास करत असलेले सरदार मेहता (रा. मध्यप्रदेश) यांची पत्नी मिला सरदार मेहता या गरोदर महिलेला अचानक तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. याची माहिती बसचे वाहक एस. एस. भालेराव (00202) यांना देण्यात आली. परिस्थितीची गंभीरता ओळखून वाहक भालेराव व चालक सुनिल कोळी (28145) यांनी प्रसंगावधान राखत बस गोळेगाव येथे तात्काळ थांबवली.
याच बसमधील प्रवासी तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील यांनी तत्काळ शासनाच्या १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येईपर्यंत बसमधील सर्व पुरुष प्रवासी, चालक व वाहक बसमधून खाली उतरले.
दरम्यान, समोर असलेल्या पटेल टी या दुकानाचे मालक अकीब पटेल यांची मदत घेण्यात आली. त्यांनी व आवेश देशमुख (रा. गोळेगाव) यांनी गावातील महिला परिचारिका (सिस्टर) वंदना हवाळे यांना तातडीने घटनास्थळी बोलावले.
तोपर्यंत बसमधील महिला प्रवासी सौ. रोहिणी मंगेश पाटील व सौ. बाविस्कर ताई (जळगाव) यांनी इतर महिलांच्या मदतीने प्रसूतीसाठी गरोदर महिलेची काळजी घेतली. त्यांच्या सहकार्यामुळे बसमध्येच महिलेची सुखरूप प्रसूती झाली व गोंडस मुलीचा जन्म झाला.
बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच खाली उभ्या असलेल्या सर्व प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. काही वेळातच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली व माता-बाळाला पुढील उपचारासाठी सिल्लोड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेत चालक-वाहक, प्रवासी, ग्रामस्थ व महिलांनी दाखवलेली माणुसकी व प्रसंगावधान कौतुकास्पद असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


