शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानाची न.पा.ने तातडीने दुरुस्ती करावी – शिवसेनेची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी)-
भुसावळ–जळगाव रोडवरील शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेले उद्यान सध्या अत्यंत दुरवस्थेत असून, त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात सुरवाडे यांनी नमूद केले आहे की, यावर्षी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र भुसावळ शहरातील त्यांच्या नावाच्या उद्यानाची अवस्था अतिशय खराब झाली असून, ही बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उन्हाळ्यापूर्वी नगरपालिकेने या उद्यानाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांसाठी सुरक्षित व सुशोभित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या संदर्भात शिवसेनेचे पदाधिकारी लवकरच नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. गायत्री भंगाळे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचेही सुरवाडे यांनी स्पष्ट केले आहे.