जळगाव, प्रतिनिधी — “दुःखीतांच्या सेवेत देह तू ठेवीलास…,” अशा भावस्पर्शी ओळींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील व्याख्यानाची सुरुवात होताच उपस्थित महिलांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांती व रथसप्तमी सणानिमित्त रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी आहुजा नगर, जळगाव येथे हळदीकुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात श्रीमती श्रद्धा रेखा राजेंद्र अभियंता (अभियंता व सामाजिक कार्यकर्त्या) यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान दिले. त्या काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती, बालहत्या प्रतिबंध गृहाचे महत्त्व तसेच स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी केलेले संघर्षमय कार्य यांचा सविस्तर ऊहापोह त्यांनी आपल्या व्याख्यानातून केला.
कार्यक्रमात प्रत्येक महिलेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे चरित्र पुस्तक, हळदीकुंकू, तिळगुळ व मोठा नॅपकिन असे ज्ञानरूपी वाण देण्यात आले. सावित्रीबाईंचा वसा व वारसा पुढे चालविण्याचा आग्रह यावेळी महिलांना करण्यात आला. या कार्यक्रमाला सुमारे दीडशे महिलांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्रीमती मनिषा पाटील यांनी केले. संयोजन मनिषा ठाकूर यांनी सांभाळले. सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी तर आभार प्रदर्शन हर्षा गुजराथी यांनी केले. तांत्रिक सहकार्य तेजल गुजराथी यांचे लाभले. तसेच परिसरातील रत्ना बनसोडे व इतर महिलांचे सहकार्य उल्लेखनीय ठरले.
याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटीच्या पदाधिकारी आशा, वंदना मंडावरे मौर्य, रेणुका हिंगु, माधुरी शिंपी, नीता वानखेडकर, शोभना मकवाना आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमातून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे प्रेरणादायी जागरण घडले.



