आई-वडील होणे सोपे; पण पालक होणे कठीण – मयूर चंदने


भुसावळ (प्रतिनिधी) –
मुलांना जन्म दिला की आपण आई-वडील होतो; मात्र खऱ्या अर्थाने पालक होण्यासाठी प्रशिक्षण व जाणीव आवश्यक आहे. आजच्या आधुनिक युगात पालकत्व निभावणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे, असे प्रतिपादन लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे साधक मयूर चंदने यांनी केले.
मनशक्ती केंद्र लोणावळा व स्थानिक केंद्र भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथील खाचणे हॉलमध्ये पालकांसाठी “सुजाण पालकत्व” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ते बोलत होते.
आज पालकांना मुलांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुले हट्टी होत आहेत, सतत बाहेरचे खाणे मागतात, ऐकत नाहीत, चंचल व विचित्र वर्तन करतात, आरोग्य व वर्तनविषयक समस्या वाढत आहेत, मोबाईलचे अतिव्यसन वाढले असून मोबाईल काढून घेतल्यास मुले आकांडतांडव करतात, अशा अनेक तक्रारी पालकांकडून ऐकायला मिळतात. त्यामुळे आई-वडील होणे सोपे असले तरी पालकत्व निभावणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत बोलताना मयूर चंदने यांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शरीर, मन (स्वभाव) आणि बुद्धी या व्यक्तिमत्त्वाच्या त्रिकोणाचा समतोल कसा साधायचा, उजव्या-डाव्या मेंदूचा विकास कसा करायचा, मेंदूशास्त्रावर आधारित अभ्यासाच्या प्रभावी पद्धती, मुलांची एकाग्रता व स्मरणशक्ती वाढविण्याचे मार्ग, अभ्यासाचे नियोजन तसेच परीक्षेला सामोरे जाण्याच्या योग्य पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मुलांवर असणाऱ्या विविध ताणांपैकी पालकांच्या अति अपेक्षांचा ताण सर्वाधिक असतो. पालकांनी मुलांची क्षमता ओळखून त्यानुसार अपेक्षा ठेवल्या तरच मुलांचा समतोल विकास होऊ शकतो, असे सांगत पालकांनी आपल्या अपेक्षा व मुलांची क्षमता यामध्ये समन्वय कसा साधायचा याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले.
या कार्यशाळेस उमा चंदने, नितीन पाटील, अशोक निकम, राजेश बोरसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गिरीश पाटील यांनी केले.