भुसावळात आरोग्याचा वाण देणारे आगळेवेगळे हळदीकुंकू उत्साहात संपन्न : सक्षम नारी फाउंडेशन, एपीएस फिटनेस, व कमल गणपती हॉलचा कौतुकास्पद उपक्रम:

भुसावळ (प्रतिनिधी) -मकर संक्रांत म्हणजे इंग्रजी नववर्षातील पहिला मराठी सण. या सणानिमित्त महिलांसाठी पारंपरिक हळदी कुंकूला आरोग्याची जोड देत APS फिटनेस, सक्षम नारी फाउंडेशन व कमल गणपती हॉल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी कमल गणपती हॉल येथे आगळावेगळ्या संकल्पनेतून हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या रजनीताई सावकारे यांच्या हस्ते झाले. दीपप्रज्वलन व गणेश पूजनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली. सक्षम नारी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा गाडेकर यांनी हळदीकुंकू समारंभाचा आरोग्याशी असलेला शास्त्रीय संबंध स्पष्ट केला. हळद ही आरोग्यदायी असून कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीला पतंग उडवल्याने सूर्यकिरणांचा लाभ होऊन व्हिटॅमिन डी तयार होते. तिळातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात, तर गुळातील लोहामुळे हिमोग्लोबीन वाढते, असे त्यांनी सांगितले.

याच संकल्पनेनुसार अर्पण हॉस्पिटल, भुसावळ यांच्या वतीने महिलांसाठी बीपी, बीएमआय, हिमोग्लोबीन, थायरॉईड तपासणी तसेच हाडांमधील कॅल्शियमची (बोन डेनसिटी) तपासणी असे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा १०० पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतला.

प्रमुख पाहुण्या आमदार रजनीताई सावकारे यांनी महिलांना मार्गदर्शन करत आपल्या आरोग्याकडे नियमित लक्ष देण्याचा सल्ला दिला. फिजिओथेरपिस्ट डॉ. श्वेता यांनी महिलांशी संवाद साधून व्यायामाचे महत्त्व सांगितले. कमल गणपती हॉलच्या संचालिका श्वेता चौहान यांनी मकर संक्रांत सणाचे महत्त्व विशद केले. तर APS फिटनेसच्या संचालिका पारूल वर्मा यांनी संतुलित आहार व नियमित व्यायामातून निरोगी जीवनशैली कशी राखता येईल यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले तसेच उपस्थित महिलांना पौष्टिक नाश्त्याचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

आरोग्य तपासणीसाठी नागेश सुरवाडे, योगिता ठाकूर, सोनाली व सना यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पारूल वर्मा, श्वेता चौहान, डॉ. सुवर्णा गाडेकर, निती अग्रवाल, किरण गोंटाला, सुनीता जोशी, शीतल भालेराव, सुनंदा डांगे व गायत्री विसपुते यांनी विशेष परिश्रम घेतले.

खेळीमेळीच्या वातावरणात आरोग्य जपणाऱ्या या आगळ्यावेगळ्या हळदीकुंकू उपक्रमाचे उपस्थित सर्व महिलांनी मनापासून कौतुक केले.