भुसावळात इराणी चैनचोर टोळीचा पर्दाफाश : ४० लाखांचे सोने, गावठी पिस्तूल व १६ दुचाकी जप्त : भुसावळ बाजारपेठ पोलीस व जळगाव गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक :

भुसावळ (प्रतिनिधी) –
जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चैन चोरीचे गुन्हे करणाऱ्या भुसावळातील इराणी टोळीचा भुसावळ बाजारपेठ पोलीस व जळगाव गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत पर्दाफाश करण्यात आला आहे. मध्यप्रदेशात घडलेल्या एका गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर आरोपींनी हल्ला केल्यानंतर पोलिसांनी भुसावळातील मुस्लीम कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबवले.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी १६ दुचाकी, सुमारे ४० लाख २५ हजार रुपये किंमतीचे सोने, एक गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या धडाकेबाज कारवाईची माहिती जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवार, १९ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उपनिरीक्षक शरद बागल, मंगेश जाधव यांच्यासह गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या टोळीमुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक शहरांत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या या निर्णायक कारवाईमुळे चैन चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसणार असून नागरिकांनी पोलिसांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.