वरणगाव (प्रतिनिधी ) – गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात विमलाई गणित-विज्ञान मालेचे दुसरे पुष्प मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय रमेश वानखेडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. चंद्रमौली जोशी, मुख्याध्यापक एम. आर. चौधरी, पर्यवेक्षक अविनाश देशमुख, सुनील वानखेडे व हितेश पाटील उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. चंद्रमौली जोशी यांनी विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय सोपे असून योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास ते अधिक रंजक ठरतात, असे सांगितले. स्पर्धा परीक्षांमध्ये सूत्रांपेक्षा योग्य उत्तराला महत्त्व असते. सूत्रे पाठ असणे आवश्यक असले तरी विविध ट्रिक्सचा वापर करून कमी वेळेत अधिक उदाहरणे सोडवणे गरजेचे आहे. केवळ सूत्रांमध्ये अडकून राहिल्यास प्रश्नपत्रिका कठीण वाटते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध सोप्या युक्त्या आत्मसात कराव्यात, असे त्यांनी नमूद केले. शालेय जीवनातच विज्ञानातील मूलभूत संकल्पना समजून घेतल्यास पुढील मोठ्या संकल्पना सहज समजतात. एखादा भाग कठीण वाटल्यास तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात सुनील वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण माहिती मिळावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने विमलाई गणित-विज्ञान माला सुरू करण्यात आल्याचे सांगितले. हा उपक्रम चौथ्या वर्षात असून हे त्यातील दुसरे पुष्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लीना ढाके यांनी मानले



