भुसावळ (प्रतिनिधी ) – ताप्ती लेडीज योगा क्लबतर्फे दि. 19 जानेवारी 2026 रोजी ताप्ती ग्राउंड येथे ‘वाण लुटूया आरोग्याचे’ या संकल्पनेवर आधारित आगळा-वेगळा हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भाग्यश्री भंगाळे यांनी केले. अध्यक्षस्थानी सौ. अनिता आंबेकर उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून सावदा येथील आधार आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत पाटील व डॉ. दिपल पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ऋतुनुसार दिनचर्या कशी असावी, कोणता आहार घ्यावा याबाबत सुंदर उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. घरातील गृहिणींनी स्वतःसाठी थोडा वेळ व्यायामासाठी दिल्यास त्या निरोगी राहून कुटुंबाची अधिक चांगली काळजी घेऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले. कामाचे योग्य व्यवस्थापन, सात्त्विक व पौष्टिक आहार यावर घराची जडणघडण होते आणि निरोगी मनातूनच सशक्त समाजनिर्मिती घडते, असा संदेश त्यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात सौ. अनिता आंबेकर यांनी ताप्ती लेडीज योगा क्लबचा उद्देश स्पष्ट करत नियमित व्यायामाचे मनावर व शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम विशद केले. यावेळी महिलांना उपयुक्त वस्तूंचे वाण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ताप्ती लेडीज योगा क्लबच्या सर्व कमिटी मेंबर्सचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच क्लबच्या अध्यक्षा सौ. स्मिताताई फालक व सल्लागार सौ. आरती चौधरी यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.


