भुसावळात ना. संजय सावकारे यांच्या हस्ते दिव्यांगांना बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींचे वाटप

भुसावळ (प्रतिनिधी):
भुसावळ तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काम, शिक्षण, उपचार तसेच इतर गरजांसाठीही त्यांना अनेकदा दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. ही अडचण दूर व्हावी आणि त्यांना स्वावलंबनाची दिशा मिळावी, या उद्देशाने पंचायत समिती भुसावळच्या वतीने दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळचे आमदार ना. संजय सावकारे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना ना. सावकारे म्हणाले की, “बॅटरीवर चालणारी सायकल ही केवळ एक साधन नसून दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनाची पहिली पायरी आहे. स्वतःच्या जोरावर बाहेर पडणे, आपली कामे स्वतः करणे आणि आत्मविश्वासाने जीवन जगणे, हा या उपक्रमामागचा खरा उद्देश आहे.”

सायकल मिळाल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि समाधान पाहून हा निर्णय किती योग्य होता, याची प्रचिती आली. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, कोणीही मागे राहू नये, हीच माझी भूमिका असून दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक सुलभ व सन्मानाने जगता यावे यासाठी असे उपक्रम पुढेही सातत्याने राबवले जातील, असेही ना. सावकारे यांनी सांगितले.

या प्रसंगी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.