भुसावळ (प्रतिनिधी ) – जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार भुसावळ नगरपरिषदेची पहिली सभा आज १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली. या सभेत स्थायी समितीचे गठन करण्यात आले असून विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची निवड निश्चित झाली. मात्र, सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्यासह गटनेते सचिन चौधरी समर्थकांसह सुभेतून बाहेर निघून गेले ज्यामुळे सभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नगरपरिषदेची एकूण नगरसेवक संख्या ५१ असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तीन नोंदणीकृत गटांची नोंदणी झाली आहे. यामध्ये: भाजप (गटनेते युवराज लोणारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट(गटनेते सचिन चौधरी) शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि अपक्ष यांचा तिसरा गट (गटनेते बबलू बऱ्हाटे) असे तीन गट नोंदणीकृत आहेत. सभेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, उपाध्यक्षा शैलेजा नारखेडे, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी राजेंद्र फातले आणि उपमुख्याधिकारी परवेझ अहमद उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच गटनेते सचिन चौधरी यांनी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना सभा बरखास्त करण्याचे निवेदन दिले होते. मात्र, जिल्हाधिकारी यांचा स्पष्ट आदेश असल्याने सभा बरखास्त करता येत नसल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विवाद आणि सभात्याग
सभेदरम्यान राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे यांनी काही नगरसेवक अजून कोणत्याही गटात सहभागी नसल्याने सभा अवैध असल्याचा दावा करून तहकूब करण्याची मागणी केली. याला प्रत्युत्तर देत भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी सभा जिल्हाधिकारींच्या आदेशानुसार कायद्याच्या चौकटीत असल्याचे सांगितले. तसेच, गटाबाहेरील नगरसेवकांना तिन्ही गटांमध्ये सामील करून घ्यावे, अशी भूमिका मांडली. उपविभागीय अधिकाऱ्यांनीही सभा नियमानुसार घ्यावी लागेल, असे सांगून मागणी फेटाळली.
यानंतर विषय समिती सभापती आणि सदस्यांच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडण्यात आले. मात्र, प्रस्ताव मांडल्यानंतर लगेचच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, गटनेते सचिन चौधरी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नगरसेवकांनी सभा सोडून थेट नगरपरिषद कार्यालयात जाऊन बसणे पसंत केले.
स्थायी समिती आणि विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली
सभात्यागानंतर पिठासीन अधिकाऱ्यांनी उर्वरित सदस्यांच्या उपस्थितीत निवडी निश्चित केल्या. उपाध्यक्षा शैलेजा नारखेडे यांची स्थायी समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपदी निवड झाली. अर्थ, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी परंपरेनुसार उपाध्यक्षच असतात, त्यानुसार शैलेजा नारखेडे यांची निवड झाली. युवराज लोणारी यांच्या प्रस्तावास गटनेते बबलू बऱ्हाटे यांनी अनुमोदन दिले.
विभिन्न विषय समित्यांच्या सभापतींची नावे खालीलप्रमाणे निश्चित झाली:
सार्वजनिक बांधकाम समिती सभापती- अनिता सतीश सपकाळे , स्वच्छता व आरोग्य समिती सभापती – मेघा देवेंद्र वाणी , पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती – महिमा अजय नागराणी , महिला व बाल कल्याण समिती सभापती – शोभा रणधीर इंगळे , नियोजन व विकास समिती सभापती – शैलेजा नारखेडे , स्थायी समिती सदस्य (सभापतींसह) – गायत्री भंगाळे (सभापती), किरण भागवत कोलते, गिरीश महाजन, सचिन संतोष चौधरी , शिक्षण समिती सभापती – राजेंद्र आवटे
उपस्थिती आणि अनुपस्थिती
सभेला भाजपचे सर्व नगरसेवक, बबलू बऱ्हाटे गटाचे सर्व नगरसेवक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सभापती पदासाठी कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आला नव्हता.
या सभेत स्थायी समिती आणि विषय समित्यांचे गठन झाल्याने नगरपरिषदेच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा आहे .



