उज्ज्वला बागुल | भुसावळ
भुसावळ पालिकेत लाेकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीचा पराभव केला. मात्र, नगरसेवक पदाच्या लढतीत भाजपचा वरचष्मा राहिला आहे. आता उपनगराध्यक्ष निवडीसाठी गुरुवारी विशेष सभा हाेत आहे. संख्याबळाचा विचार करता भाजपचा उपनगराध्यक्ष हाेईल याच शंकाच नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून डझनभर नावे या पदासाठी पुढे आली हाेती. मात्र, ऐनवेळी पक्षनेतृत्वाने स्वर्गीय माजी आमदार डी. के. चाैधरी यांच्या सूनबाई प्रिया बाेधराज चाैधरी यांच्या नावावर शिक्कामाेर्तब केले आहे. स्वीकृत सदस्य पदासाठीही तिन्ही नावे हे लेवा पाटीदार समाजाची निवडलेली आहेत. त्यात डाॅ. प्रसाद वासुदेव बाेंडे, नितीन बाबुराव धांडे, संजयकुमार नाहाटा यांचा समावेश आहे. लाेकनियुक्त नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्या घरात घेतल्याने दुखावलेल्या लेवा समाजाला गाेंजारण्याचा हा प्रयत्न मंत्री संजय सावकारेंनी केलेला दिसताे.

राष्ट्रवादी शरद पवार गट सावध
उपनगराध्यक्ष पदासाठी लागणारी मॅजिक फिगर गाठणे शक्य नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता दिसत नाही. अर्थात, ही निवड बिनविराेध हाेईल. मात्र, भविष्यात समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचाच भाग म्हणून माजी आमदार संताेष चाैधरी यांनी स्वीकृत सदस्य निवड करताना सावधगिरी बाळगली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार ते स्वत: पालिकेत जाऊ शकतात. मात्र, तशी शक्यता वाटत नाही. कारण आधीच त्यांचे सुपूत्र सचीन चाैधरी हे गटनेते म्हणून पालिकेत कार्यरत आहेत. काही निर्णय घ्यायचाच असेल तर ते समर्थ आहेत. त्या ऐवजी ते बंधू अनिल चाैधरी यांच्या वकिल असलेल्या कन्या नंदिनी अनिल चाैधरी यांना स्वीकृत सदस्यपदी संधी देऊ शकतात. तूर्त दिशा चुकवण्यासाठी संताेष चाैधरी यांनी त्यांच्यासह चार जणांचे अर्ज भरले आहेत.


