भुसावळ (प्रतिनिधी) -: दीपनगर वसाहतीतील एका खाजगी कंत्राटदाराकडे कामासाठी माणसे लावण्याचा दबाव टाकत धमकावणे, कार्यालयात अनधिकृत प्रवेश करणे, शिवीगाळ व दमदाटी करत 20 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार मिलिंद गुणवंत धर्माधिकारी (वय 51, रा. कुलकर्णी प्लॉट, गणपती मंदिराजवळ, भुसावळ) हे खाजगी कंत्राटदार आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित सम्राट बनसोडे (पूर्ण पत्ता अज्ञात) व त्याच्या दोन साथीदारांनी सुमारे चार महिन्यांपूर्वी बुधवार, दि. 14 रोजी सायंकाळी सुमारे 3.15 वाजता दीपनगर वसाहतीतील क्वार्टर नं. न्यू ई-38/1 येथील त्यांच्या कार्यालयात अनधिकृत प्रवेश केला.
तक्रारदाराच्या कंपनीत आपले लोक कामाला लावावेत, या कारणावरून रस्ता अडवून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत संशयितांनी 20 हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 09/2026 अन्वये बीएनएस कलम 308(2), 308(5), 126(2), 333, 115(2), 352, 351(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.



