भुसावळ (प्रतिनिधी ) – १४ जानेवारी मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त निसर्गनिर्मित संपत्तीचे नुकसान न करता पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्याचे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे. “तिळगुळ घ्या, गोडगोड बोला” या परंपरेप्रमाणे केवळ शब्दांपुरते न राहता भूमातेवर तिळगुळ अर्पण करून वृक्षारोपण व संगोपनाचा संकल्प करावा, असे त्यांनी सांगितले.

सध्याच्या काळात झपाट्याने होणारी वृक्षतोड, जमिनीची धूप आणि निसर्गनिर्मित साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावरील नुकसान यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याचा थेट परिणाम मानवी जीवनासह संपूर्ण सजीवसृष्टीवर होत असून अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. जंगलतोडीमुळे जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे येत असून पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत आहेत, तसेच आयुर्वेदिक औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत.
यावर्षी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतजमिनी वाहून गेल्या, जमिनीचा पोत बदलला आणि मानवी व प्राणीजीवन धोक्यात आले. हे सर्व पर्यावरणीय असमतोलाचे दुष्परिणाम असल्याचे डॉ. पाटील यांनी नमूद केले.
सध्या देशभरात हवेचे प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले असून त्यातून अनेक आजार उद्भवत आहेत. त्यामुळे अग्नी, जल, वायू, ध्वनी व प्लास्टिक प्रदूषण टाळण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे. तसेच गुरेढोरे न खात असलेल्या झाडांची लागवड वाढल्याने हवा अधिक प्रदूषित होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावर उपाय म्हणून वड, पिंपळ, नीम, औदुंबर, कडुलिंब, कदम यांसारख्या ऑक्सिजनयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड व संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे वृक्ष मानवाचे खरे मित्र असून निरोगी आयुष्य देण्यास मदत करतात, असे डॉ. पाटील म्हणाले.
मकर संक्रांतीनिमित्त महिला वर्ग हळदीकुंकू समारंभात गृहपयोगी वस्तू भेट देतो. यंदा त्याऐवजी झाडांची रोपे व विविध बियाण्यांचे वाटप करावे, अशी विनंतीही त्यांनी केली. ही बियाणे घरातील कुंड्यांमध्ये किंवा रिकाम्या पिशव्यांमध्ये वाढवून पावसाळ्यात भूमातेवर लावावीत व त्यांचे संगोपन करावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘एक पेड़ माँ के नाम’ या संकल्पनेनुसार वृक्षारोपण, बीजारोपण व संगोपन करून निरोगी, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त भारत घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी शेवटी केले.
— डॉ. सुरेंद्रसिंग पाटील
संचालक, पर्यावरण जागर प्रतिष्ठान, महाराष्ट्र


