नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांसह उपहारगृह चालक एसीबीच्या जाळ्यात

नाशिक ( प्रतिनिधी) :
गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून ती खाजगी उपहारगृह चालकांच्या मदतीने स्वीकारताना नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यातील दोन उपनिरीक्षकांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा सापळा शनिवार (दि. 10) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास यशस्वीपणे राबविण्यात आला.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय एकनाथ गोडे (रा. प्लॅट क्र. 14, शकुंतला हाइट्स, लक्ष्मीनगर, नाशिक), पोलिस उपनिरीक्षक अतुल भुजंगराव क्षिरसागर (रा. रूम क्र. 44, शासकीय विश्रामगृह, सिंहगड बिल्डिंग, नाशिक), तसेच शासकीय विश्रामगृह, सिंहगड येथील उपहारगृह चालक रमेश गंभीरराव अहिरे (वय 61) आणि कल्पेश रमेश अहिरे (वय 28) यांना अटक करण्यात आली आहे.
या लाच प्रकरणातील मूळ तक्रारदार केतन भास्करराव पवार यांच्याविरोधात नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 325/2025 दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासह तपासात मदत करण्यासाठी तपास अधिकारी दत्तात्रय गोडे यांच्यावतीने खाजगी पंटर कल्पेश अहिरे याने दोन लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
तक्रारीची शहानिशा करून एसीबीने सापळा रचला. शनिवारी रात्री लाच स्वीकारताच खाजगी पंटर कल्पेश अहिरे याला रंगेहात पकडण्यात आले. या लाच व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षिरसागर व दत्तात्रय गोडे यांनाही अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश साळवे, हवालदार दिनेश खैरनार आदींच्या पथकाने यशस्वी केली.


