इंदूर : इंदूरमध्ये डंपर आणि भरधाव कारच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात माजी गृहमंत्री बाला बच्चन यांची कन्या प्रेरणा बच्चन (26) यांच्यासह तीन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे सुमारे 4.45 वाजता तेजाजी नगर परिसरात घडली.

या अपघातात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचा मुलगा प्रखर कासलीवाल (25) आणि त्याचा मित्र मानसंधू (26) यांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनुष्का राठी या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून ते अत्यंत हृदयद्रावक आहे. फुटेजनुसार, कार सुमारे 130 ते 140 किमी प्रतितास वेगाने धावत होती. टक्कर होण्याच्या केवळ सहा सेकंद आधी चालकाने ब्रेक लावल्याचे दिसून येते. ब्रेक लावताच कार घसरत डंपरला धडकली आणि मोठा आवाज झाला.
पोलिस व प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कारचालक दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, कारचा नेमका वेग अद्याप तपासाअंती निश्चित होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तेजाजी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र मरकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल पथकाने घटनास्थळी व वाहनांची तपासणी केली. डंपरच्या मागील भागावर प्रेरणा बच्चन यांचे केस आणि मांसाचे अवशेष आढळून आले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. यावरून टक्करच्या वेळी प्रेरणा थेट डंपरला आदळल्याचे स्पष्ट होते.
तपासात असेही समोर आले आहे की, प्रेरणा बच्चन या कारच्या मागील सीटच्या मध्यभागी बसल्या होत्या आणि त्यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. जोरदार धडकेमुळे त्या पुढे फेकल्या गेल्या आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, तज्ज्ञांनी पुन्हा एकदा मागील सीटवरील प्रवाशांसाठीही सीट बेल्ट वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. नव्या कार मॉडेल्समध्ये मागील सीटवरील सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट उपलब्ध असून, भारतात आता ते बंधनकारक करण्यात आले आहेत.
या अपघातामुळे इंदूर शहरात शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.


