वरणगाव – वरणगाव पोलिसांनी दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील मोठ्या चोरीचा पर्दाफाश करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या प्रकरणी चोरीस गेलेले लोखंडी पाईप्स व इतर साहित्य जप्त करून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, दिनांक 16 डिसेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत आरोपींनी सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या साहाय्याने जंगल परिसरात लपवण्याचा प्रयत्न केला होता. चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून ३१ लोखंडीव पाईप्स, गंजलेला ऑक्सिजन सिलेंडर, घरगुती गॅस हंडी तसेच गॅस कटर असा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपासात आरोपींचा इतर गुन्ह्यांतील सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. या कारवाईत उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, जितेंद्र जैन, पोलीस कर्मचारी सुकराम सावकारे, गोपीचंद सोनवणे, ईश्वर तायडे, भूषण माळी, मनोज म्हस्के आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वरणगाव पोलिसांच्या धाडसी व प्रभावी तपासामुळे ही मोठी चोरी उघडकीस आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.


