नायलॉन मांजा विक्री-वापर केल्यास थेट ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’चा गुन्हा

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा कडक इशारा

जळगाव (प्रतिनिधी)

मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन व सिंथेटिक मांजाच्या विक्री व वापराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. यापुढे नायलॉन मांजाची विक्री किंवा वापर आढळून आल्यास थेट भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११० अंतर्गत ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.

नायलॉन मांजा मानवी जीवितासह पशु-पक्ष्यांसाठी अत्यंत घातक असून, गेल्या काही वर्षांत या मांजामुळे गळा चिरल्याने अनेक दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नफ्यासाठी जाणीवपूर्वक असा घातक मांजा विकणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य असून, नवीन कायद्यानुसार ते ‘Attempt to Culpable Homicide’ या व्याख्येत बसते. या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद असून, हा गुन्हा अजामीनपात्र आहे.

पोलीसांची व्यापक मोहीम

पोलीस अधीक्षक कार्यालय व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

साध्या वेशातील विशेष पथके: प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथके तैनात करण्यात आली असून, ती ग्राहक बनून दुकानांची गुप्त तपासणी करणार आहेत.

गोदामे व छुपे साठे: दुकानेच नव्हे तर घरे व गोदामांमध्ये लपवून ठेवलेल्या नायलॉन मांजाच्या साठ्यावरही धाडी टाकल्या जाणार आहेत.

विक्रेत्यांना नोटिसा: जिल्ह्यातील सर्व पतंग विक्रेत्यांना BNS तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कलम १४९ (BNSS १६८) अंतर्गत पूर्वनोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

लागू होणारी कायदेशीर कारवाई

नायलॉन मांजाच्या विक्री, साठा किंवा वापर प्रकरणी आरोपींवर खालील कलमांखाली गुन्हे दाखल केले जाणार आहेत—

BNS कलम ११०: सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न (१० वर्षांपर्यंत शिक्षा)

BNS कलम २२३: जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन

पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ व १५: ५ वर्षांपर्यंत कारावास व १ लाख रुपये दंड

नागरिकांना आवाहन

नायलॉन मांजा न तुटणारा असल्याने दुचाकीस्वारांच्या गळ्याला फास लागून गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. तसेच विजेच्या तारांवर अडकल्यास शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांना नायलॉन मांजा खरेदी करून देऊ नये. सुरक्षिततेच्या दृष्टीने कापसाचा किंवा सूती मांजाच वापरण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

परिसरात नायलॉन मांजाची विक्री किंवा साठा आढळून आल्यास तात्काळ ११२ हेल्पलाइन किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. तक्रारदाराची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.